Virat Kohli Injury: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत रविवारी हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. भारतीय खेळाडू दुबईतील आयसीसी अकॅडेमीत सराव करत आहेत. विराट कोहली संघातील इतर खेळाडूंपेक्षा १ तास आधीच सराव करण्यासाठी दाखल झाला होता. त्याने मैदानावर कसून सराव केला. यादरम्यान त्याच्या पायाला चेंडू लागला. त्यामुळे तो पायाला आईस पॅक लावताना दिसून आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शनिवारी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. सर्वात आधी सरावासाठी मैदानात आलेल्या विराट कोहलीच्या पायाला चेंडू लागल्यानंतर तो मैदानाबाहेर जाऊन बसला. तो पायाला आईस पॅक लावताना दिसून आला. मात्र काही वेळानंतर तो पुन्हा एकदा मैदानात आला. विराट पाकिस्तामविरुद्ध पूर्णपणे फिट होऊन मैदानात उतरणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विराट कोहली दुखापतग्रस्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तो इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळताना दिसून आला नव्हता. त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला बाहेर बसावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा त्याच्या पायाला चेंडू लागला. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचं खेळणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
विराट कोहलीची बॅट पाकिस्तानविरुद्ध खेळताना आग ओकते. सध्या तो आऊट ऑफ फॉर्म आहे. मात्र पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध पार पडला होता. या सामन्यात विराट अवघ्या २२ धावांवर माघारी परतला होता.