भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) तयारीत व्यस्त आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू दुबईत कसून सराव करत आहेत. 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाला पहिला सामना खेळायचा असल्याने प्लेइंग इलेव्हनच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यादरम्यान भारताच्या गोटात अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भारताच्या संघ निवडीदरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि संघ निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्यात जोरदार वाद झाल्याचे वृत्त आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्या निवडीवरुन प्रशिक्षक गंभीर आणि निवडकर्ता आगरकर यांच्यात खटके उडाल्याचे समजत आहे.
त्याचे झाले असे की, मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने घरच्या मालिकेत इंग्लंडला 3-0 ने व्हाईटवॉश केले. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी खासकरुन श्रेयस अय्यरने चांगली कामगिरी केली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 2 अर्धशतकांसह 181 धावा केल्या. खरंतर, अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नव्हती, पण पहिल्या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या दुखापतीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. अय्यरने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि 60.33 च्या सरासरीने धावा केल्या.
गौतम गंभीर आणि अजित आगरकरमध्ये जोरदार वाद!
आता टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अय्यरच्या निवडीवरून मुख्य प्रशिक्षक गंभीर आणि मुख्य निवडकर्ता आगरकर यांच्यात जोरदार वाद झाल्याचे समजत आहे. या वादाचे एक मुख्य कारण म्हणजे गंभीरला मधल्या फळीतील फलंदाजीत डाव्या-उजव्या फलंदाजांच्या संयोजनावर भर द्यायचा होता.
त्याच अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की गंभीरच्या नेतृत्वाखाली, संघ व्यवस्थापनाने निवडकर्ता आगरकर यांच्या इच्छेविरुद्ध, केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान दिले आहे. आगरकरांची यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती रिषभ पंत होता हे उघड झाले आहे. परंतु गंभीरने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत स्पष्ट केले होते की, सध्या राहुल हा त्याचा नंबर-1 यष्टिरक्षक आहे आणि तो भविष्यातही खेळेल.