WPL 2025 : महिला प्रीमियर लीग स्पर्धेत (WPL 2025) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रनआउटच्या निर्णयावरून चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल ३ निर्णय चुकीचे दिले गेले होते. मुख्य बाब म्हणजे हे तिन्ही निर्णय मुंबई इंडियन्सच्या विरोधात गेले. आता महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या नियमात मोठा बदल केला जाणार आहे. इथून पुढे रनआऊट घेतला किंवा स्टम्पिंग केल्यास फक्त एलईडी लाईट पेटणं पुरेसं नसेल, तर बेल्स पूर्णपणे खाली पडणंही तितकंच गरजेचं असणार आहे. यापूर्वी लाईट पेटली की फलंदाज बाद असा निर्णय दिला जायचा, मात्र यापुढे असं होणार नाही.
काय सांगतो क्रिकेटचा नियम?
महिला प्रीमियर लीगमध्ये ज्या एलईडी स्टम्पचा वापर केला जातोय, त्या स्टम्पला चेंडूचा जराही स्पर्श झाला, तर एलईडी लाईट पेटते आणि अंपायरला निर्णय घ्यावा लागतो. मात्र आता बेल्स पूर्णपणे बाहेर येणार नाही, तोपर्यंत रनआऊट किंवा स्टम्पिंग ग्राह्य धरली जाणार नाही.हा नियम महिला प्रीमियर लीगमध्ये कायम राहणार आहे.
याआधी यष्टीरक्षकाचा स्टम्पला जरासाही स्पर्श झाला की, स्टम्पची एलईडी पेटायची. हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी चांगलं आहे. पण हे फलंदाजांच्या दृष्टीने योग्य नव्हतं. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात चुकीचे निर्णय दिल्यामुळे सामना फिरला होता. आता बेल्स पूर्ण कधी बाहेर येतील हे पाहून तिसरे अंपायर आपला निर्णय देतील. माध्यमातील वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंना या नियमाबाबत सांगण्यात आलं होतं. मात्र हे नियम सामना झाल्यानंतर सांगण्यात आले होते.
हेही वाचा-
घटस्फोट की लूट? धनश्रीला काडीमोड देण्यासाठी चहलला तब्बल इतक्या कोटींची पोटगी द्यावी लागणार?