Danish Kaneria Trolled Babar Azam : बाबर आझम (Babar Azam) हा बऱ्याच काळापासून पाकिस्तान क्रिकेट संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. त्याची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. आता त्याच्यावरील दबाव आणखी वाढला आहे, कारण २३ फेब्रुवारी रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा सामना भारताशी (IND vs PAK) होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने बाबर आझमला स्वार्थी म्हणत नवा वाद निर्माण केला आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला ३२१ धावांचे मोठे लक्ष्य गाठायचे होते. मोठे लक्ष्य असूनही, बाबर आझमने ९० चेंडूत ६४ धावांची अतिशय संथ खेळी केली. या संथ खेळीमुळे त्याच्यावर बरीच टीका झाली.
बाबर आझम स्वार्थी आहे…
आता वृत्तसंस्था पीटीआयनुसार, आझमवर टीका करताना दानिश कनेरिया म्हणाला की, “जर बाबर आझमबद्दल बोलायचे तर तो स्वतःसाठी खेळतो. जेव्हा तो दबावाखाली असतो तेव्हा तो चांगली आकडेवारी राखण्याव्यतिरिक्त आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहण्याचा प्रयत्न करतो. मी अर्धशतक झळकावले आहे, मी ते केले आहे. पण त्याच्यात संघासाठी जिंकण्याचा कोणताही हेतू नाही.”
पुढे दानिश कनेरियाने खुसदिल शाह आणि सलमान आगा यांचे कौतुक केले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सलमान आगाने ४२ धावांची जलद खेळी केली. त्याच वेळी, खुशदिल शाहनेही ६९ धावांची जलद खेळी खेळली आणि पाकिस्तानी संघाला मोठ्या पराभवापासून वाचवले.
भारताची स्थिती खूप मजबूत आहे.
दुसरीकडे २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दानिश कनेरियाचा असा विश्वास आहे की एकीकडे भारत मजबूत स्थितीत आहे आणि त्यांनी सलग चार सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान संघाने सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे सध्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय संघ उत्तम क्रिकेट खेळत असल्याचे कनेरियाचे म्हणणे आहे.
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर होणार?