Ind vs Pak Playing XI: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (champions trophy 2025) स्पर्धेत आज क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा सामना रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर आज भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ भिडणार आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारत विजयाने श्रीगणेशा केला होता. तर यजमान पाकिस्तानला पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यासाठी पाकिस्तानच्या प्लेइंग ११ बदल होणार हे जवळजवळ निश्चित आहे. तर भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कुठलाही बदल होणार नाही. कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.
भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी ताप आला आहे. त्यामुळे तो सराव करण्यासाठी देखील मैदानावर आला नव्हता. मात्र त्याला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी होती. त्यामुळे केएल राहुल या सामन्यातही खेळताना दिसून येऊ शकतो. बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात केएल राहुलने शेवटी फलंदाजीला येऊन ४१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने शुभमन गिलसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी देखील केली होती.
भारतीय संघाची प्लेइंग ११ बदलणार?
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सामन्यातही डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊ शकतात. गेल्या सामन्यात दोघांनी मिळून चांगली सुरुवात करून दिली होती. गिलने १०१ धावांची खेळी केली होती. तर रोहितने ४१ धावा केल्या होत्या. त्यामुळे या सामन्यातही हिच सलामी जोडी असेल. यासह अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.
या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:
भारताची प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
पाकिस्तानची प्लेइंग ११ : इमाम-उल-हक, बाबर आझम, सऊद शकील, मोहम्मद रिजवान (कर्णधार आणि यष्टिरक्षक), सलमान आगा, तय्यब ताहीर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रऊफ, अबरार अहमद.
हेही वाचा –
“Babar Azam संघाला जिंकवण्यासाठी खेळत नाही”, माजी पाकिस्तानी खेळाडूचा गंभीर आरोप