Ajinkya Rahane On Comeback : एकेकाळी भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार राहिलेला, फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचे नशीब आजमावत आहे. तो बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असल्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करत राष्ट्रीय संघात पुनरागमनाची संधी निर्माण करत आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात मुंबई संघाचे नेतृत्त्व करताना रहाणेने (Ajinkya Rahane) शतक ठोकत भारतीय संघाचे दार ठोठावले होते. आता या 36 वर्षीय फलंदाजाने टीम इंडियात पुनरामगन करेन असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच भारतीय संघातून वगळल्यानंतर आपल्या भावना काय होत्या?, याबद्दल मोकळेपणाने बोलला आहे.
रहाणेने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मी नेहमीच लाजाळू होतो, पण आता तसं नाही. आधी माझे लक्ष क्रिकेट खेळण्यावर आणि घरी जाण्यावर होते. पण क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असेल असे मला कोणीही सांगितले नव्हते. आजही कधीकधी मला क्रिकेट खेळून घरी जावेसे वाटते. पण आता मला काही जणांनी सांगितले आहे की, मला माझ्या मेहनतीबद्दल बोलायवे लागेल, मला सतत बातम्यांमध्ये यावे लागेल. पण मी तुम्हाला सांगतो की माझी कोणतीही पीआर टीम नाही, माझा एकमेव पीआर म्हणजे माझे क्रिकेट.”
भारतीय संघातून डावलल्याबाबत बोलताना रहाणे पुढे म्हणाला, “मी कधीही निवडकर्त्यांना जाऊन विचारणार नाही की मला संघातून का काढून टाकले जात आहे किंवा माझी निवड का केली गेली नाही? मी याबद्दल बोलत नाही. काही लोकांनी मला जाऊन बोलायला सांगितले पण जेव्हा त्यांना बोलायचेच नसते तेव्हा बोलून काही उपयोग नाही. मी कधीही कोणालाही मेसेज केला नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून मला वगळण्यात आले तेव्हा मला वाईट वाटले होते. पण मला खात्री आहे की मी माझी जागा पुन्हा मिळवेन.”
“स्पष्ट आहे की, मी पहिल्या पेक्षा जास्त अनुभवी आहे. पण तरीही मी स्वत:ला तरूण खेळाडू समजतो. मी मोठ्या स्पर्धामध्ये तितक्याच ताकदीने उतरण्याची क्षमता ठेवतो. मी या खेळावर प्रेम करतो आणि चांगली कामगिरी करण्याची भूक कायम आहे. मी माझ्या खेळाने कधीच संतुष्ट नसतो आणि कोणतीच गोष्ट गृहीत धरत नाही.”, असेही रहाणेने सांगितले.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची?
1 Comment
Pingback: हाय व्होल्टेज मॅचची क्रेझ! दुबईत IND Vs PAK सामन्याच्या एका तिकीटाची किंमत तब्बल ४ लाख - Sportswordz.com