Morne Morkel Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions Trophy) स्पर्धा सुरू व्हायला २४ तासांहूनही कमी वेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. तर भारतीय संघ आपल्या अभियानाची सुरुवात २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाचं (Team India) टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.
भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल स्पर्धेच्या एक दिवसाआधी अचानक मायदेशी परतला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, मॉर्ने मॉर्कल वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला आहे. मात्र खरं कारण अजून कळू शकलेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाहता मॉर्ने मॉर्कल संघासोबत असणं गरजेचं आहे. कारण संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
मॉर्ने मॉर्कल जरी मायदेशी परतला असला तरीदेखील भारतीय संघाला याचा फार फरक पडलेला दिसून आलेलं नाही. भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून आले आहेत. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळालेल्या केएल राहुलकडून मोठ्या अपेक्षा असणार आहे. त्याने फलंदाजीत कसून सराव केला. त्याला संघात स्थान टिकवून ठेवायचं असेल, तर येणाऱ्या सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल. कारण रिषभ पंत त्याची जागा घेण्यासाठी तयार आहे.
फलंदाजांवर मोठी जबाबदारी
भारतीय संघाला ही स्पर्धा जिंकायची असेल तर फलंदाजीत जोर लावावा लागेल. संघातील अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. आता हे अनुभवी खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’, Champions Trophy पूर्वी पाकिस्तानी खेळाडूनेच उडवली संघाची खिल्ली