PAK vs NZ: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ Match) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. कराचीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षकाने असं काही केलं जे पाहून तुम्हाला चिड आल्याशिवाय राहणार नाही.
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की, या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडला हवी तशी सुरुवात करता आली नाही. सलामीला आलेला डेवोन कॉनव्हे आणि केन विलियम्सन दोघेही स्वस्तात माघारी परतले. त्यांनतर विल यंगच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. त्याने ९६ धावांवर फलंदाजी करत असताना खणखणीत शॉट मारला. जो बाऊंड्री लाईनच्या दिशेने जात होता. हॅरिस रऊफ चेंडू अडवण्यासाठी मागे धावत होता. हॅरिस रऊफने चेंडू अडवला, इतक्यात यंगने ३ धावा धावून पूर्ण केल्या. मात्र त्यानंतर रिप्लेमध्ये जे दिसलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
रिप्लेमध्ये पाहिलं असता, हॅरिस रऊफचा हात बाऊंड्री लाइनला स्पर्श झाल्याचं दिसून आलं. मात्र हॅरिस रऊफने हे मान्य केलं नाही आणि अंपायरने काही ४ धावा दिल्या नाहीत. यावरून आता सोशल मीडियावर तुफान वाद पेटला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.
विल यंगची शतकी खेळी
न्यूझीलंडचे अनुभवी फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विल यंगने मोर्चा सांभाळला. ठाणे पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या डावात फलंदाजी करताना त्याने ११३ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने १०७ धावांची खेळी केली.