Ind vs Ban Highlights: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने दमदार सुरुवात केली आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या २२९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि केएल राहुलच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह विजयी सुरुवात केली.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला. कारण ५० धावांच्या आत बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर हृदोय आणि जाकेर अलीने १५४ धावांची भागीदारी केली यादरम्यान हृदोयने वैयक्तिक १०० धावा केल्या. तर जाकेर अलीचं शतक हुकलं. त्याने ६८ धावांची खेळी केली. दरम्यान मोहम्मद शमीच्या ५ गडी बाद करण्याच्या बळावर बांगलादेशचा डाव २२८ धावांवर आटोपला.
गिलची शानदार शतकी खेळी
या धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी देखील दमदार सुरुवात केली. भारताकडून गिल आणि रोहितची जोडी मैदानावर आली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. यादरम्यान रोहित ४१ धावांवर माघारी परतला. तर गिलने शेवटपर्यंत किल्ला लढवला. रोहित बाद झाल्यानंतर विराटवर मोठी जबाबदारी होती.
मात्र तो अवघ्या २२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर अय्यरही १५ धावांवर तंबूत परतला. केएल राहुलआधी अक्षर पटेलला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गंभीरचा हा निर्णय फसला. कारण तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. शेवटी गिल आणि राहुलने मिळून भारताचा डाव सांभाळला. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. यादरम्यान गिल १०१ तर राहुल ४१ धावांवर नाबाद परतला.