SA vs AFG: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आतापर्यंत २ रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. स्पर्धेतील तिसरा सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. पाकिस्तानच्या कराचीमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. यासह दक्षिण आफ्रिकेने ५० षटकअखेर ३१५ धावांचा डोंगर उभारला आहे.
दुबईची फिरकी गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी आणि अनुभवी फिरकीपटूंची भरमार असलेल्या अफगाणिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. हा निर्णय कुठेतरी फसतो की काय, असं वाटत असताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ताबडतोड फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेला धावांचा डोंगर उभारून दिला.
दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. जोर्जी स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रिकल्टन आणि टेंबा बावूमाने मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून १०० हून अधिक धावा जोडल्या. यादरम्यान बावूमाने ५८ धावांची खेळी केली. तर सलामीवीर रिकल्टनने १०३ धावांची खेळी केली. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या रासी वान दर दुसेनने ५२ धावा चोपल्या.
डावखुऱ्या हाताच्या डेव्हिड मिलरला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. शेवटी एडन मार्करमने ५२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ५० षटकअखेर ६ गडी बाद ३१५ धावा केल्या.
तर अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना मोहम्मद नबीने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर फारुकी, उमरजाई आणि अहमदने प्रत्येकी १–१ गडी बाद केला.