Ind vs Pak Match Details: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील सर्वात मोठा सामना येत्या रविवारी रंगणार आहे. या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. ज्या क्षणाची सर्वच क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. तो भारत – पाकिस्तान सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याचा नाणेफेक दुपारी २ वाजता होईल. तर २:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. हा दोन्ही संघांचा या स्पर्धेतील दुसरा सामना असणार आहे. पाकिस्तानला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला आहे.
हा सामना पाकिस्तान संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण भारताने जर पाकिस्तानला हरवलं तर, पाकिस्तानसाठी सेमीफायनल गाठणं जवळजवळ अशक्य असेल. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरो सामना असेल. मात्र तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला हरवणं हे पाकिस्तानसाठी भर दिवसा पाहिलेल्या स्वप्नाहून कमी नसेल.
हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. यासह हॉटस्टारवरही लाईव्ह पाहू शकता. या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ स्पर्धेतील पराभवाचा बदला घेणार? की पाकिस्तानचा संघ विजयाची लय कायम ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.