Champions Trophy IND vs PAK Record : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) रणसंग्राम आजपासून (19 फेब्रुवारी) सुरू होणार आहे. कराचीच्या मैदानावर यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. मात्र क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती, 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK Match) हाय व्होल्टेज सामन्याची. क्रिकेटविश्वातील कट्टर प्रतिद्वंद्वी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी राहिला आहे. परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास (IND vs PAK Head To Head Record) काय आहे? आणि कोणता संघ कुणावर वरचढ राहिला आहे?, हे आपण येथे जाणून घेणार आहोत.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा 1998 मध्ये सुरू झाली. त्यानंतर, या स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान एकूण पाच वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या पाच सामन्यांमध्ये पाकिस्तान भारतावर वरचढ राहिला असून पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाला फक्त दोन वेळा पाकिस्तानला पराभूत करता आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ पहिल्यांदा 2004 मध्ये भिडले होते, जिथे पाकिस्तानी संघाने भारतावर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर, 2009 मध्ये, पुन्हा एकदा पाकिस्तान संघाने भारताचा धुव्वा उडवला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा पाकिस्तानवर पहिला विजय 2013 मध्ये मिळवला होता, जेव्हा त्यांनी त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याचा 8 गडी राखून पराभव केला होता. तर 2017 मध्ये साखळी फेरीत भारतीय संघाने पाकिस्तानचा 124 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पण जेव्हा ते पुन्हा अंतिम सामन्यात आमनेसामने आले तेव्हा पाकिस्तानने भारतीय संघाचा 180 धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता.
भारत वि. पाकिस्तान यांच्यातील कामगिरी
2004 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तानने 3 विकेट्सने विजय
2009 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तान 54 धावांनी विजय
2013 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारताने 8 विकेट्सने विजय
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत 124 धावांनी विजय
2017 चॅम्पियन्स ट्रॉफी (अंतिम) – पाकिस्तान 180 धावांनी विजयी
आता 23 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या लढतीत कोणता संघ विजयी होतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा –
Rohit Sharma: रोहित शर्माला जखमी करण्याचा डाव? हिटमॅनने स्वतः केला खुलासा
1 Comment
Pingback: चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा 'हा' फिरकीपटू विरोधी फलंदाजांना फोडेल घाम, पाँटिंगची भविष्यवाणी