ICC Punished Pakistan Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील (ICC Champions Trophy 2025) न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर पाकिस्तानपुढे (Pakistan) आता भारतीय संघाचे आव्हान असेल. भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात २३ फेब्रुवारी रोजी दुबईच्या मैदानावर रंगतदार लढत होईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. तत्पूर्वी पाकिस्तान संघासाठी एक वाईट बातमी आली आहे.
कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध षटकांची गती कमी राखल्याबद्दल (Slow Over Rate) पाकिस्तानला गुरुवारी (२० फेब्रुवारी) त्यांच्या सामन्याच्या शुल्काच्या पाच टक्के दंड ठोठावण्यात आला. स्पर्धेचा यजमान आणि गतविजेत्या पाकिस्तानला बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध ६० धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) म्हटले आहे की, पाकिस्तानचा संघ निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकल्याबद्दल दोषी आढळला आहे. मैदानावरील पंच रिचर्ड केटलबरो आणि शरफुद्दौला, तिसरे पंच जोएल विल्सन आणि चौथे पंच अॅलेक्स व्हार्फ यांनी संघावर आरोप लावले तर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दंड ठोठावला आहे. पाकिस्तानच्या सामन्याच्या मानधनातून पाच टक्के फी कपात करण्यात आली आहे.
पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने गुन्हा कबूल केला असल्याने औपचारिक सुनावणीची आवश्यकता पडली नाही. खेळाडू आणि खेळाडूंच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार, जे किमान षटकांच्या गतीच्या गुन्ह्यांशी संबंधित आहे, खेळाडू दिलेल्या वेळेत ५० षटके टाकण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या सामना शुल्काच्या पाच टक्के दंड आकारला जातो.
असे आहे पाकिस्तान संघाचे वेळापत्रक
दरम्यान न्यूझीलंडविरुद्धचा सामना गमावल्यानंतर पाकिस्तानला २३ फेब्रुवारीला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताविरुद्ध दुसरा साखळी फेरी सामना खेळायचा आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पाकिस्तानचा सामना बांगलादेश संघाशी होईल. या दोन्हीपैकी एकही सामना गमावल्यास पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो.
हेही वाचा-
मोठी बातमी! सौरव गांगुलीच्या कारला भीषण अपघात, कसा आहे माजी कर्णधार? Sourav Ganguly Accident
1 Comment
Pingback: IND Vs PAK : "आम्ही भारतापेक्षा कमजोर...", चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यापूर्वी पाकिस्तानने मानली हार! - Sportsw