IND vs PAK Highlights: यजमान पाकिस्तान संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाविरुद्ध झालेला सामना हा पाकिस्तानसाठी करो या मरो सामना होता. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकून पाकिस्तानकडे स्पद्धेत टिकून राहण्याची संधी होती. मात्र ही संधी पाकिस्तानने गमावली. दरम्यान विराट कोहलीच्या शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या २४१ धावांवर आटोपला. या डावात पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम अवघ्या २३ धावांवर माघारी परतला. त्यानंतर स्वतः कर्णधार मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलने मिळून डाव सांभाळला. शकीलने शानदार अर्धशतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवानचं अर्धशतक थोडक्यात हुकलं
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ३ गडी बाद केले. पाकिस्तानचा संपूर्ण डाव २४१ वर संपुष्टात आला.
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २४२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, शुभमन गिल आणि रोहित शर्माने ताबडतोड सुरुवात करून दिली. गिलचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. शेवटी विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने मिळून डाव सांभाळला. विराटने आपल्या शतकाची प्रतिक्षा संपवत शानदार शतकी खेळी केली. तर श्रेयस अय्यरने शानदार अर्धशतक झळकावलं. यासह भारताने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.