Pak vs NZ Live Score: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि बलाढ्य न्यूझीलंड (PAK vs NZ) या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल यजमान पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पाहुण्या न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकअखेर ५ गडी बाद ३२० धावांचा डोंगर उभारला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, यजमान पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. डेवोन कॉनव्हे १० तर अनुभवी केन विलियम्सन अवघ्या १ धावेवर माघारी परतला. त्यानंतर डॅरिल मिशेलही अवघ्या १० धावांवर तंबूत परतला. मात्र इथे न्यूझीलंडचा डाव गडगडला नाही.
विल यंग आणि टॉम लेथम यांनी मिळून न्यूझीलंडचा डाव सांभाळला. दोघांनी शानदार शतक झळकावलं. सलामीला आलेल्या विल यंगने ११३ चेंडूत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १०७ धावांची खेळी केली. तर टॉम लेथमने १०४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११८ धावांची खेळी केली. शेवटी ग्लेन फिलिपच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत ३९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने ६१ धावा केल्या.
या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ५ गडी बाद ३२० धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी ३२१ धावांची गरज आहे. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना नसीम शाह आणि हॅरिस रऊफने प्रत्येकी २–२ गडी बाद केले. तर अहमदला १ गडी बाद करता आला.