Champions Trophy, Fakhar Zaman : यजमान पाकिस्तान संघाची चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ (Champions trophy 2025) स्पर्धेची सुरुवात लाजिरवाण्या पराभवाने झाली आहे. बुधवारी (१९ फेब्रुवारी) कराचीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा (PAK vs NZ) ६० धावांनी दारुण पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर स्पर्धेतून (Champions Trophy Updates) बाहेर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान आता यजमान संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे.
पाकिस्तानचा धाकड सलामीवीर फखर जमान (Fakhar Zaman) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाल्याचे वृत्त समोर येत आहे. दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
माध्यमांतील वृत्तांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना फखर जमानला दुखापत झाली होती. सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर, हा खेळाडू चेंडूमागे धावला आणि यादरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली. या दुखापतीनंतर फखर बराच वेळ मैदानाबाहेर राहिला आणि जेव्हा तो मैदानात परतला तेव्हा त्याची तब्येत ठीक दिसत नव्हती. त्यानंतर पाकिस्तानने त्याला फलंदाजीसाठी पाठवले तेव्हा त्याची दुखापत आणखी वाढली. फखर शॉट्स खेळताना अनेक वेळा वेदनेने तडफडत असल्याचे दिसून आले, परिणामी त्याची दुखापत अधिक गंभीर झाली असावी.
न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी करतानाही, फखर सलामीला आला नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ४१ चेंडूत २४ धावांची खेळी केली. यावरूनच हे स्पष्ट झाले की फखर पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि तो भारताविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.
पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा धोका!
दरम्यान पाकिस्तानचा संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याचा धोका अधिकच वाढला आहे. खरं तर, पाकिस्तानने आधीच आपला पहिला सामना गमावला आहे आणि जर २३ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध पराभव झाला तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधून त्यांचे बाहेर पडणे जवळजवळ निश्चित होईल. अशा परिस्थितीत, भारत आणि न्यूझीलंड संघांना गट अ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. आता पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध पुनरागमन करत स्पर्धेतील आपले स्थान टिकवून ठेवू शकेल की नाही? हे पाहावे लागेल.
हेही वाचा-
Pak vs NZ: १० दिवसात तिसऱ्यांदा हरवलं.. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर पाकिस्तानची लाज काढली!
1 Comment
Pingback: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला आणखी एक झटका, आयसीसीने ठोठावला दंड | Pakistan Team - Sportswordz.com